मुंबई । पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील लवासा सिटी अंतर्गत अनधिकृत बांधकाम सुरू असून पर्यावरणासाठी हानिकारक नसल्याचे पर्यावरण मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. यावर आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सदर उत्तर चुकीचे असल्याची हरकत घेतल्यानंतर लवासा सिटीत झालेल्या अनियमिततेची चौकशी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणकडून 3 महिन्यात करणार असल्याची घोषणा केली. लिखित उत्तरात चुकीची माहिती दिल्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पाचर्णे यांनी हरकत घेऊन चौकशीबाबत विचारणा केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आमदार भिमराव तापकीर यांनी मुळशी (जि. पुणे) येथिल लवासा सिटीअंतर्गत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता.
आवश्यक कागदपत्रे ताब्यात
प्रशोत्तराचा तास रद्द करून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याच्या मागणीच्या गोंधळात तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला. त्याविरोधात विरोधीबाकावरून हरकत घेत घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच लवासाच्या प्रश्नावर चर्चा उरकण्यात आली. यावेळी गोंधळातच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्य सरकारने 2008 मध्ये मुळशी तालुक्यातील लवासा सिटी कॉर्पोरेशनला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. त्यावेळी बांधकाम नियमावलींनुसार पर्यावरणाचे निकष पुर्ण करुन बांधकामे करण्यात आली आहेत,अशी माहिती दिली. दरम्यान मे महिन्यामध्ये लवासाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करुन पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरणाचे सर्वाधिकार देण्यात आले आहे. त्यानुसार काही दिवसांपुर्वी आवश्यक सर्व फायली, कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे कदम यांना सांगितले.
पर्यावरणाची हानी झाल्याचे लोकलेखा समिती अहवालात नमूद
पर्यावरण मंत्र्यांच्या लेखी उत्तरामध्ये अनधिकृत बांधकामे झाले नसल्याचे नमूद आहे, यावर आमदार बाबुराव पाचर्णे यांनी हरकत घेतली. पाचर्णे यांनी लोकलेखा समितीच्या अहवालामध्ये लवासामध्ये पर्यावरणाची हानी करुन अनधिकृत बांधकामे झाल्याचे नमुद केले असताना मंत्रीमहोदयांनी हे उत्तर कसे काय दिले? असा सवाल पाचर्णे यांनी केला. तसेच चुकीचे उत्तर देणार्यांवर काय कारवाई करणार? अशी विचारणा केली. त्यावर आपल्या उत्तराची सारवासारव करत कदम यांनी येत्या तीन महिन्यांच्या आत पीएमआरडीएकडुन चौकशी केली जाईल. प्राधिकरणाला चौकशीचे आदेश दिले असून लवासाची पुन्हा पाहणी करत दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन कदम दिले.