ऑनर किलिंगच्या केसेस काही आपल्यासाठी नवीन नाहीत. मुलगी प्रेमविवाह करून पळून गेली, म्हणजे आपले तोंड काळं केलं. समाजात तोंड दाखवायला जागा राहिली नाही, असे मानणारे पालक इथे कमी नाहीत. या रागातून झालेल्या हत्या सगळ्या सारख्याच असतात. त्यांना जाती धर्माच्या चष्म्यातून वेगवेगळे तोलायची गरज नाही. राजस्थानमध्ये शंभूलालने मुहम्मद अफराजुलची हत्या केली. त्याच्या काही दिवस आधी बिहारमध्येसुद्धा अशीच एक घटना घडली होती. मुलगी एका हिंदू मुलाबरोबर पळून गेली म्हणून एका मुस्लीम कुटुंबाने दोघांचा बळी घेतला.
लव्ह जिहाद मुस्लीम तरुण हिंदू तरुणींना फूस लावून पळवतात. त्यांच्याशी लग्न करून धर्मांतर घडवतात. हिंदू धर्मीयांविरोधात हा एक मोठा कट आहे. या कामासाठी मुस्लीम तरुणांना त्यांच्या संघटनांकडून पैसे मिळतात, वगैरे वगैरे चर्चा आता नेहमीचीच झालीय. अखिला उर्फ हादिया प्रकरण तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. आपल्या मुलीशी शफीन जहानने फसवून लग्न केले. त्याचे आयसिसशी संबंध आहेत. आपल्या मुलीला ते सीरियात घेऊन जाणार आहेत, असा तिच्या पालकांचा दावा होता. आता यात सत्य किती?, हे कळायला वेळ लागेल. मूळ मुद्दा असा की कुणाच्याही प्रभावाखाली का असेना, पण अखिलाने स्वतःहून धर्मांतर केले आहे. न्यायालयातसुद्धा तिने ठामपणे तशी साक्ष दिली आहे. त्यामुळे शफीनवर बळजबरीचा आरोप करताच येत नाही. सर्वोच्च न्यायालयसुद्धा त्यांना एकत्र येण्यापासून अडवू शकत नाही, हेच खरे.
दुसरी घटना राजस्थानची. राजस्थानच्या शंभूलाल रैगरने मुहम्मद अफराजुल खान या मजुराची हत्या केली. इतक्यावरच न थांबता त्याने आपल्या 14 वर्षीय पुतण्याला हाताशी धरून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. जो कुणी लव्ह जिहाद करण्याची हिंमत करील त्याची अशीच अवस्था करण्यात येईल असा दमही भरला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी शंभूलाल आणि त्याच्या पुतण्याला अटक केली. विशेष म्हणजे याही घटनेत संबंधित महिलेने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची साक्ष दिलीय. ती महिला स्वतःच्या मर्जीने एका मुस्लीम तरुणाबरोबर पश्चिम बंगालमध्ये गेली होती आणि स्वतःच्याच मर्जीने परतही आली. मृत मजुराचा या प्रकरणाशी काही संबंध असल्याचे अजून तरी समोर आलेले नाही.
आजपर्यंत लव्ह जिहादची इतकी प्रकरणे गाजली, पण यातील एकाही तरुणीने तेव्हा किंवा कालांतराने आपल्याला फसवले गेल्याची-जबरदस्तीची तक्रार केलेली नाही. मग दुसर्या कुणाला आरोपी करण्याचा प्रश्नच कुठे येतो? हिंदू मुलींशी लग्न करणे हे मुस्लिमांच्या कारस्थानांचा भाग असू शकेल, पण मग हिंदू तरुणींची सारासार विवेक बुद्धी कुठे गेली? प्रेम आणि फसगत यातलं अंतर त्यांना कळत नाही का? हिंदू मुलींना समज नाही, अक्कल नाही असा या तक्रारदारांचा दावा आहे का? जर मुली स्वतःच्या मर्जीने घर-धर्म सोडत असतील, तर त्याला इतरांचा विरोध का?
लव्ह जिहादविरोधात होणार्या हिंसाचाराकडेसुद्धा नेमके याच दृष्टीने पाहायला हवे. आपल्या मर्जीविरुद्ध मुलीने लग्न केले की सगळ्याच परिवारांत खळबळ माजते. अगदी जातीत-नात्यात लग्न झाले तरी वाद होतात. मुलीला कुटुंबाशी बांधून ठेवणारा प्रेमाचा धागा कुचकामी ठरतो तिथे दहशत जन्म घेते. ऑनर किलिंगच्या केसेस काही आपल्यासाठी नवीन नाहीत. मुलगी प्रेमविवाह करून पळून गेली, म्हणजे आपले तोंड काळं केलं. समाजात तोंड दाखवायला जागा राहिली नाही, असे मानणारे पालक इथे कमी नाहीत. या रागातून झालेल्या हत्या सगळ्या सारख्याच असतात. त्यांना जाती धर्माच्या चष्म्यातून वेगवेगळे तोलायची गरज नाही. राजस्थानमध्ये शंभूलालने मुहम्मद अफराजुलची हत्या केली. त्याच्या काही दिवस आधी बिहारमध्येसुद्धा अशीच एक घटना घडली होती. मुलगी एका हिंदू मुलाबरोबर पळून गेली म्हणून एका मुस्लीम कुटुंबाने दोघांचा बळी घेतला. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या जाती धर्मात अशा अनेक घटना घडल्यात.
पीडित मुस्लीम आहे की अन्य कुणी याने काही फरक पडत नाही. प्रेताच्या टाळूवरचे लोणीही खायची सवय असलेली मंडळी मात्र याला धर्माचे नाव देतात. हेट स्पीच ग्रेट ठरतात. आगीत तेल ओतले जाते. माणसाला माणूस न समजता, त्याच्या जाती धर्मावरून गुन्ह्याची तीव्रता ठरते. लव्ह जिहाद आणि त्याविरोधातला आवेशसुद्धा असाच फायद्याचा व्यवहार आहे, बाकी काही नाही. मुळात जे दहशतवादी लव्ह जिहाद साठी पैसा पुरवतात असा आरोप आहे, तेसुद्धा काही धर्माचे खरे पाईक नाही. जनमानसात पाठिंबा मिळवण्यासाठी ते त्यांच्या धर्माचा वापर करतात. आपल्याकडचे काही व्होट बँकेसाठी तेच उद्योग करतात. लोकांच्या डोळ्यावर धर्माची पट्टी बांधून ते आपापले कार्यभाग साधतात. माणूस म्हणून आपण मात्र बुडत जातो, एवढेच!
– सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका खारघर, मुंबई
9867298771