नवी दिल्ली : केरळमधील उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’ म्हणत विवाह रद्द ठरवलेल्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएने करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. या चौकशीतून धर्मांतर केलेल्या महिलेची बाजूही समजून घेतली जाईल, असे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास करून अहवाल लवकरात लवकर सादर करा, असे आदेशही न्यायालयाने एनआयएला दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या नेतृत्वाखालील एनआयएचे पथक हा तपास करणार आहे.
न्यायपीठ समजून घेणार लव्ह जिहादची व्यापकता
या आधी 10 ऑगस्टरोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला तपासासाठी सहकार्य करा, ज्यामुळे लव्ह जिहादची व्यापकता किती आहे, हे समजेल असे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश एनआयएला दिले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी होणार आहे. एनआयएचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील विचार केला जाईल, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. केरळमधील गृहस्थ अशोकन के. एम. यांनी शफीन जहान याने आपल्या मुलीचे धर्मांतर करून जबरदस्तीने लग्न केल्याची याचिका दाखल केली होती. त्यावर केरळ उच्च न्यायालयाने निर्णय देताना ते लग्न रद्द केले होते. उच्च न्यायालयाने आपला विवाह रद्द ठरल्याच्या विरोधात शफीन जहान याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्ता जहानचे वकील कपिल सिब्बल यांनी विवाहितेची साक्ष नोंदवण्याची मागणी केली. त्यामुळे सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश देत अंतिम निर्णय देण्याआधी या प्रकरणातील विवाहितेची साक्ष नोंदवणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. दरम्यान, ही बाब दोन धर्मांमधील असल्याने न्यायालयाला याबाबत कोणताही निर्णय देताना सावधगिरीने राखली पाहिजे, असे वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी म्हटले आहे.
धर्मांतर व निकाहचे धक्कादायक प्रकरण?
केरळमधील या महिलेने धर्मांतर करून इस्लाम धर्म स्विकारणे आणि नंतर मुस्लीम तरूणाशी लग्न करणे ही प्राथमिकदृष्ट्या वेगळी घटना नाही, असे एनआयएने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले होते. इतर प्रकरणातही हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात या तरूणांचा सहभाग होता, असे एनआयचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, या प्रकरणाचा एनआयएकडून तपास व्हावा असे सर्वोच्च न्यायालयाला वाटत असल्याने आमची त्याला काहीच हरकत नाही, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे. शफीन जहान हा आयएस या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून, त्याला हिंदू स्त्रियांचे धर्मांतर करण्याची कामगिरी सोपवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या महिलेचे धर्मांतर करून तिला सीरियामध्ये आयएससाठी काम करण्याकरिता पाठविण्यात येणार होते, असा आरोप आहे. आपल्या मुलीचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात आले होते. तिला कट्टरपंथी बनविण्याच्या हेतुनेच हे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप या मुलीचे वडील अशोकन के. एम. यांनी केला होता. त्यांनी हा लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचे म्हटले होते.