‘लव्ह जिहाद’: लाईव्ह मर्डरने राजस्थान हादरले!

0

जयपूर : लव्ह जिहादला विरोध दर्शविण्यासाठी राजस्थानमधील उदयपूर येथील राजसमंदमध्ये कॅमेर्‍यासमोर करण्यात आलेल्या निर्घृण हत्येचे पडसाद देशभर उमटू लागले असून, पोलिसांनी शंभूलाल नावाच्या आरोपीला अटक केली आहे. मृताचे नाव मोहम्मद अफराजूल असून, तो 50 वर्षांचा होता. आरोपी शंभूलालने अफराजूलचा कुर्‍हाडीने सपासप वार करून खून करून मृतदेह पेट्रोल ओतून जाळला. यानंतर त्याने अंगाचा थरकाप उडविणार्‍या या हत्याकांडाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल केला. प्रेमाच्या नावाखाली हिंदू मुलींचे धर्मपरिवर्तन करणार्‍यांचे असेच हाल होतील, अशी धमकी आरोपीने दिली असून, भारतात लव्ह जिहाद संपवला नाही तर प्रत्येक भारतीयाची अवस्था अशीच होईल, असेही या आरोपीने या व्हिडिओत म्हटले आहे. राजस्थान सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती गठीत केली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह मानवाधिकार आयोगानेही या घटनेचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे, या हत्याकांडाचे लाईव्ह चित्रण आरोपीचा अल्पवयीन भाचा करत होता. मृतकाने आरोपीच्या बहिणीसोबत लव्ह जिहाद केला होता, अशी चर्चाही सुरु होती, त्यातून हे सूडकांड घडल्याचे बोलले गेले.

आरोपीने तीन व्हिडिओ केले व्हायरल..
या घटनेने राजस्थान पोलिस दलातही खळबळ उडाली आहे. या घटनेने राजस्थानमध्ये तणावपूर्ण शांतता असून, सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून पोलिस प्रयत्न करत आहेत. अफराजूल या 50 वर्षीय व्यक्तीला मारणार्‍या आरोपीने आपण गुरूवारी सकाळी नऊ वाजता रामेश्वर मंदिरात आत्मसमर्पण करणार असल्याचेही व्हिडिओत म्हटले होते; परंतु, तो पोलिसांकडे आला नाही. त्यानंतर राजसमंद पोलिसांनी सकाळी साडेनऊ वाजता केलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आरोपी शंभूलाल यास अटक केली. या घटनेनंतर राजसमंद परिसरात तणाव निर्माण झाला होता. तत्पूर्वी पोलिसांना घटनास्थळावरून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला होता. राजस्थान पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनेवर लक्ष ठेवून असून, गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनीही घटनेची माहिती घेतली. घटनेनंतर मोठ्याप्रमाणात पोलिस कुमक राजसमंदकडे रवाना करण्यात आली. आरोपी शंभूलालने हत्येच्या व्हिडिओसह आणखी दोन व्हिडिओ व्हायरल केले आहेत. एका व्हिडिओत तो मंदिरात हत्येची जबाबदारी स्वीकारत आहे तर दुसर्‍या व्हिडिओत तो भगव्या ध्वजासमोर बसून भाषण देत आहे.

आरोपीला जाहीर फाशी द्या : मृताचे कुटुंबीय
या घटनेत मारला गेलेला 50 वर्षीय मोहम्मद अफराजूल हा मूळचा पश्चिम बंगालचा असून, त्याच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला जाहीर फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या 12 वर्षापासून अफराजूल हा राजस्थानमध्ये मजुरी करतो. त्याला वृद्ध आई, पत्नी आणि एक मुलगी आहे. मुलीचे दोन महिन्यांवरच लग्न आलेले आहे. या घटनेचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षांनीही निषेध केला आहे. संघटनेच्या अध्यक्षा कविता श्रीवास्तव यांनी सांगितले, की अशा प्रकारे लव्ह जिहादच्या आरोपातून केली गेलेली नऊ महिन्यातील चौथी हत्या आहे. यापूर्वी पहलू खान, जफर खान, उमेर खान आणि आता अफराजूल यांचा समावेश आहे. या घटना रोखणे ही गरजेची बाब आहे. ही घटना राजनगर पोलिस ठाण्यापासून शंभर मीटरवर असलेल्या देव हेरिटैज रस्त्याजवळ घडली. अर्धवट जळलेला मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी पोहोचले.