श्रीनगर : लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजाना याच्यासह दोन दहशतवाद्यांना काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी ठार केले. हाकरीपोरा गावात अबू दुजानासह तीन दहशतवादी एका घरात लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर जवानांनी पहाटे साडेचार वाजता दहशतवाद्यांना घेरले. जवानांनी दहशतवादी लपून बसलेले घरच स्फोटकांनी उडवून दिले. त्यानंतर अन्य दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली. अबू दुजानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षादलांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे.
लष्कराच्या शोधाला अखेर यश
काश्मीरमध्ये लश्कर-ए-तोयबासाठी काम करणारा अबु दुजाना पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्तिस्तानमधील राहणारा आहे. 2013 मध्ये दहशतवादी अबु कासिम यांच्या निधनानंतर दुजाना याला कमांडर म्हणून नेमले होते. 2014 पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. त्याच्यावर 15 लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. काश्मीरमध्ये त्याने अनेक दहशतवादी घडवले होते. भारतीय लष्कर मागील काही दिवसांपासून अबु दुजानाच्या शोधात होते.
अनेकदा बचावला
भारतील जवानांनी पुलवामाच्या बंदेरपुरा गावात 19 जुलैलाही अबु दुजानाला घेरले होते. लष्कर आणि एसओजीच्या जवानांनी अबु दुजानाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. परंतु दुजाना चकवा देऊन पसार झाला होता. मे महिन्यातही सुरक्षादलाने हकरीपोरा गावातच दुजानाला घेरले होते. त्याच्या साथीदारांसह तो गावात लपल्याची माहिती मिळाली होती. तेव्हाही जवानांनी त्याला पकडण्यासाठी ऑपरेशन सुरु केले होते. मात्र, गावकर्यांच्या जवानांवर दगडफेक केल्याने अबु दुजानने पळ काढला होता.