‘लष्कर‘च्या दहशतवाद्याला अटक

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी मुजफ्फरनगरमधून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली. संदीप कुमार शर्मा असे त्याचे नाव असून, तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. संदीप कुमारच्या मदतीने लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी एटीएमची लूट करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. संदीप कुमार याच्या वडिलांचे नाव राम शर्मा आहे. आदिल व संदीप या दोन्ही नावाने तो वावरत होता. संदीप हा गुन्हेगार असून, तो शोपूरच्या शकूर नावाच्या व्यक्तीमार्फत लष्करच्या संपर्कात होता, अशी माहिती जम्मू-काश्मिरचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली.

लष्करच्या कारवाया वाढल्या
काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षादलाच्या चकमकीत शनिवारी लष्कराचा टॉप कमांडर बशीर लष्करीसह दोन दहशतवादी ठार झाले होते. गेल्या महिन्यात अचबलमध्ये पोलिस दलावर झालेल्या हल्ल्यात लष्करी हा सामील होता. या हल्ल्यात ठाणे प्रभारी फिरोज अहमद यांच्यासह सहा पोलिस शहीद झाले होते. तसेच दहशतवाद्यांनी मृतदेहांची विटंबना केली होती व त्यांचे चेहरे विद्रूप केले होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या नौगांवमध्ये सुरक्षा दलाने रविवारी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.