मुंबई : ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन मुंबईतून सलीम खानला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील निवासी असलेल्या सलीमला मुंबई विमानतळावरुन अटक केली आहे.
महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि उत्तर प्रदेश एटीएसने सोमवारी संयुक्त कारवाई केली. मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी सलीम खान या संशयित दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या. सलीमने पाकिस्तानममधील मुजफ्फराबादच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले होते. सलीमला अटक झाल्याने पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते. सलीम खान हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूरचा रहिवासी आहे. सलीम कोणत्या दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता हे अजून समजू शकलेले नाही. सलीमने ‘लष्कर’साठी हेरगिरी करणार्यांना आर्थिक रसद पुरवली होती. गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशमधून लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला अटक झाल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील एटीएसने उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधून संदीप शर्मा याला अटक केली होती. काश्मिरी तरुणीच्या प्रेमात पडलेल्या संदीपने तरुणीच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरुन दहशतवादाचा मार्ग स्वीकारला होता. दहशतवाद्यांसाठी कार चालवण्याचे काम तो करायचा. दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलीस कर्मचार्यांची हत्या आणि बँक लुटीसारख्या घटनांमध्ये संदीप सहभागी होता. जम्मू- काश्मीर पोलिसांच्या कारवाईतूनच सलीमचा खुलासा झाला होता.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसची संयुक्तपणे कारवाई
सलीम ऊर्फ आबू आमीर मुकीम खान हा मूळचा उत्तर प्रदेशच्या मनीपूर जिल्हा, फतेहपूरचा रहिवाशी आहे. 1 जानेवारी 2008 रोजी रामपूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये एक फियादीन हल्ला झाला होता. याप्रकरणी तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात फियादीन हल्ल्याची नोंद करुन त्याचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता. या हल्ल्यात सलीम खान याचा सहभाग होता, तो गेल्या दोन वर्षांपासून युपी एटीएसच्या रडार होता. याच दरम्यान तो विदेशात पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध युपी पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते. युएईमध्ये असलेला सलीम खान हा छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळताच युपी एटीएस पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले होते. या पथकाने जुहू एटीएस पोलिसांची मदत घेऊन आंतरराष्ट्रीय विमानतळावर साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी विमानतळावर आलेल्या सलीमला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तोच सलीम मोहम्मद खान असल्याची खात्री होताच त्याला या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी उत्तर प्रदेशात नेण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी सलीम हा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाला होता. युएई येथून तो पाकिस्तानात गेला आणि तेथील मुजफ्फदाराबाद येथे त्याने अतिरेकी प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर तो तोयबाच्या काही बड्या अतिरेक्यांच्या संपर्कात होता. सलीमने तोयबासाठी हेरगिरी करणार्या आर्थिक मदत केल्याचेही बोलले जाते. यापूर्वी युपी एटीएसने संदीप शर्मा नावाच्या एका तरुणाला अटक केली होती. संदीप हा तोयबासाठी काम करीत होता. त्याचे एका काश्मीरी तरुणीशी प्रेम होते. तिच्या प्रेमाखातर तिच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरुन तोयबामध्ये सामिल झाला होता. त्यानंतर तो याच संघटनेसाठी काम करु लागला. अतिरेक्यांसाठी कार चालविण्याचे काम तो करीत होता. काश्मीरमध्ये काही पोलिसांच्या झालेल्या हत्या तसेच बँक दरोड्यातही संदीपचा सहभाग होता. संदीपनंतर आता सलीम खान हा पकडला गेल्याने तोयबाला जबदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते. सलीमच्या चौकशीत अनेकधक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याने उत्तर प्रदेशातील काही तरुणांना तोयबामध्ये सामिल करण्यासाठी प्रयत्न केले होते, त्याला हवालामार्फत कोणाकडून पैसे येत होते, ते पैसे तो कोणाला देत होता याची सविस्तर माहिती काढण्याचा युपी एटीएसचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत.