नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – एकगठ्ठा मतांसाठी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) संघटना आसाममध्ये भाजपपेक्षा वेगाने पसरली आहे, असे वक्तव्य भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी केले होते. लष्करप्रमुखांनी एआययूडीएफ आणि बांगलादेशी शरणार्थींवर केलेल्या या वक्तव्याचा वाद वाढत चालला आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रावत यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राजकीय पक्षांवर वक्तव्य करणे लष्करप्रमुखांनी टाळले पाहिजे. लष्करप्रमुखांचे ते काम नाही, असे त्यांनी सुनावले. दरम्यान, या वादावर भारतीय लष्काराने बिपीन रावत यांचे वक्तव्य योग्य असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप आणि काँग्रेसने लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर राजकारण केले जाऊ नये. त्यांनी आसामच्या परिस्थितीवर भाष्य केले होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संविधानाकडून अधिकार नाही
लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या वक्तव्यावर वाद वाढला चालला असून, एमआयएमनेते असदुद्दीन ओवेसींनी लष्करप्रमुखांच्या वक्तव्याचा विरोध केला. ते म्हणाले, लष्करप्रमुखांनी एखाद्या राजकीय पक्षाविषयी बोलणे किंवा त्याच्या विकासाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार त्यांना भारतीय लोकशाही आणि संविधान देत नाही. त्यांनी अशा वक्तव्यापासून दूर राहिले पाहिजे. ओवेसी यांच्या या प्रतिक्रियेनंतर लष्करानेही खुलासा केला असून, लष्करप्रमुख रावत यांचे वक्तव्य राजकीय किंवा कोणत्याही धर्मासबंधी नसल्याचे म्हटले आहे. तर लष्करप्रमुखांनी समस्येबद्दल माहिती दिली आहे. त्यावर वाद करु नये, असे भाजपनेते सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले आहे.
भाजप कुठच्या कुठे पोहोचला : रावत
पूर्वोत्तर सीमा भागाच्या सुरक्षेवर दिल्लीत एक परिषद झाली. या परिषदेमध्ये लष्करप्रमुख बिपीन रावत म्हणाले होते की, आसाममध्ये एआययूडीएफ एक पक्ष आहे. तुम्ही या पक्षाच्या वाढीकडे पाहिले तर लक्षात येईल की ज्या पद्धतीने भाजप 1984 मध्ये 2 खासदारांचा पक्ष होता आणि आज कुठे पोहोचला आहे. त्यापेक्षाही अधिक वेगाने एआययूडीएफ वाढत आहे. यावेळी मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येच्या अहवालाचा हवाला देत रावत म्हणाले होते की, काही भागात शरणार्थींची संख्या वेगाने वाढत आहे. सरकार पूर्वोत्तर भागाकडे लक्ष देत आहे. तिथे विकास केला जात आहे. त्याभागात राहणार्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही सन्मान करतो. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असेल किंवा स्त्री-पुरुष कोणीही असो. तिथे राहणार्या प्रत्येक नागरिकाला देशाच्या इतर भागात राहणार्या लोकांसोबत जोडले पाहिजे आणि मग विकास केला पाहिजे.