लष्करप्रमुख रावत आणि जनरल डायर सारखेच!

0

नवी दिल्ली । इतिहासकार पार्था चॅटर्जी यांनी लष्करप्रमुख मेजर जनरल बिपिन रावत यांची ब्रिटीश जनरल डायरशी तुलना केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. चॅटर्जी यांनी एका लेखात काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना रोखण्यासाठी मानवी ढालीचा वापर केल्याच्या घटनेवरून रावत यांची तुलना डायरशी केली आहे. यावरून लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनी चॅटर्जी यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे आपण विचारांवर ठाम असल्याचे चॅटर्जी यांनी म्हटले आहे.

लेखातून केली तुलना
ब्रिटीश जनरल डायर जालियनवाला बाग हत्याकांडामुळे कुप्रसिद्ध आहे. डायरच्या आदेशानंतर निष्पाप भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. चॅटर्जी यांनी वायर या न्यूज पोर्टलसाठी लिहिलेल्या लेखात काश्मीर जनरल डायरच्या काळातून जात आहे, असे म्हटले आहे. 1919 मधील जालियनवाला बाग हत्याकांड आणि काश्मीरमध्ये लष्कराने मानवी ढालीचा केलेला वापर यामध्ये साम्य असल्याचे त्यात म्हटले आहे. चॅटर्जी यांनी लेखाची सुरुवातच जनरल डायरच्या विधानाने केली आहे. त्यात जालियनवाला बाग हत्याकांडाचे डायरने समर्थन केले आहे. त्यानंतर त्यांनी काश्मीरमधील मानवी ढालीच्या वापराच्या घटनेचा उल्लेख केला आहे. काश्मीरमध्ये डर्टी वॉर सुरू असल्याचे चॅटर्जी यांनी म्हटले आहे. लष्करप्रमुखांनी या घटनेचे समर्थन करताना जवानाने कर्तव्य बजावल्याचे सांगून केवळ समर्थनच केले नाही तर, मेजर गोगोईंची पाठही थोपटली आहे, असाही उल्लेख त्यांनी केला आहे. जालियनवाला बागेत भारतीयांची हत्या करणारा डायरही या कृत्याला कर्तव्य समजत होता. आपण बंडखोरांचा सामना करत आहोत, असे त्याला वाटत होते, असे या लेखात म्हटले आहे.

सर्व स्तरातून टीका
या लेखावरून इतिहासकार पार्था चॅटर्जी यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक (निवृत्त) यांनी हे धक्कादायक आहे, असे सांगून लेख प्रसिद्ध करणार्‍या मीडिया हाऊसवरही जोरदार टीका केली आहे. तर चॅटर्जी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा यांनी केली आहे. भारतात असे लोक असतील तर पाकिस्तानची गरजच नाही, अशी टीका कर्नल व्ही. एन. थापर यांनी चॅटर्जी यांच्यावर केली आहे.