नवी दिल्ली : लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सुमारे चार जवान जखमी झाले आहेत. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरून लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांने दिली आहे. चार जवान जखमी झाले असून गंभीर जखमी झालेला दोन जवान शहीद झाले आहेत. संपूर्ण परिसरात नाकांबदी करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर परिसरात लष्कराने त्वरित सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारीच लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली होती. त्याच्या दुसर्या दिवशीच दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्याबाबत अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्यांनी कृष्णा घाटी येथे पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. भारतीय लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.