गुवाहाटी । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या धोला सादिया पुलाचे लोकार्पण करणार आहे. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या या पुलामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या दक्षिण तटावर असलेला धोला विभाग उत्तर तटावरील सादिया विभागाशी जोडला जाणार आहे. सुमारे 9.15 किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतरही खूप कमी होणार आहे. या पुलाची निर्मिती करुन भारताने चीनला जशास तसे उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. सीमेलगत चीन वेगाने रस्ते आणि इतर गोष्टींची निर्मिती करत आहे. त्यामुळे चीन सीमेलगत भारताने आपले लष्करी तळांना मजुबती देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रात भाजप सत्ता आलेल्याला तीन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे 26 मे रोजी पंतप्रधान मोदी या पुलाचे उद्घाटन करत आहे. दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचाही एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या पुलाचे बांधकाम सुरुवातीला खूप हळूहळू होत होते. पण पंतप्रधानांनी या पुलाच्या कामात स्वारस्य दाखवले आणि कामाला होत असलेल्या दिरंगाईची कारणे माहिती करून घेतल्यावर कामाने वेग घेतल्याचे सोनोवाल म्हणाले. हा पुल बांधण्यासाठी आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री मुकुट मिथी यांनी 2003 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे मागणी केली होती.
अंतर कमी होणार
भारताच्या पूर्व सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात निरनिराळी बांधकामे केली आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुलाला खूप महत्त्व आले आहे. या पुलामुळे आसामला लागून असलेल्या चीन सीमेवर लष्करी सामानाची वाहतूक करणे सोपे होणार आहे. या पुलामुळे तीन ते चार तासांमध्ये भारतीय लष्कराला चीन सीमेवर जाता येईल. याठिकाणी भारताच्या किबिथू, वालाँग आणि चागलगाम येथे लष्करी चौक्या आहेत.
सन 2011मध्ये कामाला सुरुवात
धोला सादिया पुलाच्या बांधकामास 2011 मध्ये सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे 876 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता आणि या पुलाचे काम 2015 मध्ये पूर्णत्वास जाईल असा अंदाज होता. या प्रोजेक्टचे व्यवस्थापक बी.सूर्यराजू यांच्या मते ब्रम्हपुत्रा नदीला येणारे पूर, अवकाळी पावसामुळे वर्षभरातून केवळ चार महिने या पुलाचे काम चालायचे. असे असतानाही 2017 मध्ये हा पूल पूर्ण करण्यात आला. नियोजित अंदाजपत्रकापेक्षा सुमारे 100 कोटी रुपये जास्त खर्च करण्यात आला.
भिलाईतील लोखंड, स्टील
केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्रालयाने हैदराबादच्या नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेडच्या भागीदारीने या पुलाचे काम केले. या पुलाच्या निर्मितीसाठी नवयुग कंपनीने स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाला (सेल) 24 हजार टन लोखंडी सळ्या, अँगल प्लेट बनवण्याचे कंत्राट दिले होते. सेलने ही जबाबदारी भिलाई स्टील प्लांट आणि दुर्गापूर इस्पात संयंत्र या कंपन्यांवर सोपवली होती. लष्कराच्या रणगाड्यांची वाहतूक होऊ शकेल, अशा पद्धतीने पुलाचा आराखडा तयार केला.
दुसर्या क्रमाकांचा पूल
ब्रम्हपुत्रा नदीवर तयार करण्यात आलेला 9.15 किलोमीटर अंतराचा हा पूल आशियातील दुसर्या क्रमांकाच सर्वाधिक लांबीचा पूल आहे. या पुलाचे एक टोक अरुणाचल प्रदेशातील धोला येथे तर दुसरे टोक आसाममधील तिनसुकीया जिल्ह्यातील सादिया गावात आहे. या पुलामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील अंतर 4 तासांनी कमी होणार आहे. या पुलाची रुंदी 42 फूट इतकी आहे. वाहनांना ये जा करण्यासाठी या पुलावर दोन लेन बनवण्यात आल्या आहे. मुंबईतील वांद्रे वरळी सी लींकपेक्षा हा पूल 3.55 किलोमीटर लांब आहे. या पुलावरून 60 टन वजनाच्या रणगाड्याची वाहतूक करता येणार आहे. आसामची राजधानी दिसपूरहून 540 किलोमीटर आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरहून 300 किलोमीटर अंतरावर आहे.