लष्करी तळावर दहशतवादी हल्ला

0

दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर : जम्मूतील रहिवासी सुंजवान परिसरात असलेल्या लष्करी तळावर शनिवारी सकाळी आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवानांसह एका मुलीचा मृत्यू झाला असून, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह जोरदार सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. या हल्ल्यात अन्य तीन जवानांसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत जम्मू-काश्मीरचे पोलिस प्रमुख एस. पी. वेद यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याची माहिती घेतली. घटनेवर गृहमंत्रालय लक्ष ठेवून असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

अधिकार्‍याची मुलगी ठार
शनिवारी सकाळी तीन ते चार दहशतवादी सुंजवानस्थित लष्करी तळात घुसले. तळाच्या सुरक्षा गेटवर तैनात असलेल्या जवानांना अंधारात काही तरी संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्याने आवाज दिला असता, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. तसेच, दोन गट करून हे दहशतवादी तळात घुसले. लष्करी कुटुंबीयांसाठी असलेल्या सदनिकांत हे दहशतवादी लपून बसले. या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अधिकार्‍याच्या मुलीसह दोन जवान शहीद झाले तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर हे दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी सुमारे शंभरपेक्षा अधिक लष्करी जवानांनी नाकाबंदी करून त्यांची शोधमोहीम सुरु केली होती. या जवानांच्या गोळीबारात एका दहशतवाद्याला मारण्यात यश आले असले तरी, अन्य दहशतवादी पळून गेले. त्यांच्या शोधासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह जोरदार सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची माहिती घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

गुप्तचरांकडून पूर्वसूचना?
लष्करी तळातच दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता पाहाता, तळातील प्रत्येक सदनिका तपासून पाहिली जात होती. तसेच, तळावर हेलिकॉप्टरद्वारेही निगरानी केली जात होती. ज्या ठिकाणी दहशतवादी लपले असावेत, असे वाटते तेथे बॉल कॅमेरे फेकून तपासणी केली जात होती. दहशतवाद्यांनी झोपलेल्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला होता. त्यात लष्करातील अधिकार्‍याच्या मुलीचाही बळी गेला. ही मुलगी सुट्टीत वडिलांना भेटायला आली होती. या हल्ल्याबाबत गुप्तचरांनी पूर्वसूचना दिली होती, अशी माहितीही हाती आली आहे. संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुच्या फाशीचा पाचवा स्मृतीदिन पाहाता, हा हल्ला करण्याची योजना जैश-ए-मोहम्मदने रचली असल्याचे गुप्तचरांनी लष्कराला कळविले होते, असेही सूत्राने सांगितले.