श्रीनगर : मध्य काश्मिरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि अतिरेक्यांमध्ये तब्बल 11 तास सुरू असलेली चकमक अखेर थांबली. या चकमकीत लष्कराने एका अतिरेक्याचा खात्मा केला. अन्य अतिरेक्यांचा शोध सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. लष्कराचा एक जवान जखमी झाला असून चकमक सुरू असताना अतिरेक्यांना सहाकार्य करण्यासाठी लष्करावर दगडफेक करणार्या दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. सुरक्षा यंत्रणांनी मृत अतिरेक्याजवळून काही शस्त्र ताब्यात घेतली आहेत.
11 तास सुरू होती चकमक
एका पोलिस अधिकार्याने सांगितले की, अतिरेकी लपून बसल्याचे समजताच सुरक्षा दलांनी चदूरा क्षेत्रातील दरबाग परिसराची ताबडतोब नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. यावेळी अतिरेक्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरू झालेली चकमक तब्बल अकरा तास सुरू होती. ज्यावेळी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू होती त्याच वेळी मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने जवानांवर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी पॅलेटगनचा वापर केला तसेच आश्रूधूराची नळकांडी फोडली. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला..
अन्य अतिरेकी पळाले
अतिरेकी जेव्हा दोन पोलिस अधिकार्यांच्या घरात गोळीबार करत घुसले तेव्हा सुरक्षा दलांनीही गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली. यानंतर अन्य अतिरेकी घटनास्थळावरून पळून गेले. तर एका अतिरेक्याला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले. तर दुसरीकडे पुलवामा आणि द्रामगाम येथे अतिरेक्यांच्या घरातून लष्कराने हॅन्डग्रेनेड जप्त केले. या ठिकाणाहून अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले.
युवकांचे वर्तन दुर्भाग्यपुर्ण
दरम्यान जम्मू-कश्मिरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी राज्यातील लोकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, हिंसा करून काहीही प्राप्त होणार नाही. यासाठी हिंसेचा मार्ग सोडून सर्वांनी संवादाकडे वळावे. राज्यातील युवक अतिरेक्यांचे समर्थन करतात हे दुर्भाग्यपुर्ण आहे. लष्कराने लपून बसलेल्या अतिरेक्यांना समर्पण करण्याचे आवाहन केले होते पण त्यांनी ऐकले नाही. मेहबुबा मुफ्ती पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आल्या असताना त्यांच्या ताफ्यावर आचबल आनंतनाग येथे नागरिकांनी दगडफेक केली. या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
अतिरेक्यांना सहकार्य करतात युवक
बडगाम जिल्ह्यात चकमक सुरू असताना लष्कराचे जवान अतिरेक्यांशी लढत होते तर दुसरीकडे काही स्थानिक युवक अतिरेक्यांचे समर्थन करण्यासाठी जवानांवर दगडफेक करत होते. अतिरेक्यांना पळून जाता यावे यासाठी ही दगडफेक करण्यात येत होती. लष्कराच्या गाड्यांवर देखील या युवकांनी दगडफेक केली. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात येत होती.