पिंपरी-चिंचवड : मुले म्हणजे केवळ दंगाच करतात असे नाही, तर याच मुलांच्या दक्षतेमुळे एका मुक्या जिवाला प्राण मिळाले आहेत. मांजरीच्या तावडीत सापडलेल्या गव्हाणी घुबडास, परिसरात खेळत असलेल्या मुलांच्या दक्षतेमुळे वेळीच वाचविण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी घडली.
मुलांची समयसुचकता
चिंचवड येथील रेल विहार कॉलनी, बिजलीनगर येथे मांजरीच्या तावडीत घुबड सापडले. हे तिथे खेळणार्या मुलांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आसपासच्या नागरिकास याची माहिती दिली. याची माहिती मिळताच रहिवासी विद्यार्थी आर्चीस रेळेकर, आर्यन पाटील यांनी पर्यावरण- पक्षी मित्र, प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांना त्वरित कळवले. यानंतर पाटील यांनी त्वरित रेल वसाहत येथे धाव घेतली. यावेळी मांजराला घाबरून पार्क केलेल्या चारचाकी गाडीखाली बसले होते. तिथून हळूवारपणे काढण्यात आले.
पंखाला दुखापत
मांजराशी झालेल्या झटापटीमध्ये घुबडाच्या उजव्या पंखाला जखम झाली आहे. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. प्रथमोपचार करून त्यास महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय येथे पक्षीतज्ञांकडे सुपूर्त करण्यात आले. त्यावेळेस त्यांनी सांगितले सदरचे घुबड गंभीर जखमी नसल्यामुळे दोन दिवसांच्या उपचारानंतर हे पुन्हा उडू शकेल. संक्रातीच्या दिवशी एका मुक्या जीवास जीवनदान दिल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला.