बावधन । महाफॅशन फाउंडेशन आणि नृत्यभक्ति फाउंडेशन यांच्या वतीने ‘लहेजा’ फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. लहेजा कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती महाफॅशन फाउंडेशनचे लक्ष्मीकांत गुंड व नृत्यभक्ति फाउंडेशनच्या सई परांजपे यांची होती.
15 मॉडेल्स व कलाकारांचे सादरीकरण
लहेजाचे वैशिष्ट म्हणजे भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार व त्या संबंधित पोशाख, अलंकार व इतर सामुग्री पहिल्यांदाच या फॅशन शोच्या माध्यमातून सादर करण्यात आली. कोरिओग्राफर सत्यजीत जोगळेकर यांच्या दिग्दर्शनांतर्गत 15 मॉडेल्स आणि विविध क्षेत्रातील कलाकारांनी रॅम्प वॉक केला. यामध्ये तबला वादक पं. रामदास पळसुले, भरतनाट्यम कलाकार परिमल फडके, अभिनेत्री भार्गवी चिरमुले व स्वप्नाली पाटील, गायिका सावनी रविंद्र, वर्षा राजखोआ, नृत्य-दिग्दर्शक शाल्मली टोळे यांचा समावेश होता.
भरतनाट्यम्, कत्थक, ओडिसीसह
भरतनाट्यम्, कत्थक, ओडिसी व मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांवर आधारित चार फेर्या लहेजामधून सादर करण्यात आल्या. प्रत्येक फेरीची सुरुवात शास्त्रीय नृत्याविष्काराने करण्यात आली. तत्पूर्वी प्रत्येक शास्त्रीय नृत्य प्रकाराची माहिती, त्यास आवश्यक पोशाख, आभुषणे, केशरचना आदींची माहिती देण्यात आली. आपल्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांचा प्राचीन इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘लहेजा’चे आयोजन करण्यात आले होते.