भोसरी – परिसरातील लांडेवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र मागे रहदारीचा रस्ता आहे. पालिकेने ही जमीन ताब्यात घेऊन पक्का रस्ता बनवावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक अशोक बेलापूरकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बँकेच्या मागे खासगी जागा आहे. त्या ठिकाणी वापराचा रहदारीचा रस्ता आहे. मात्र, जागामालकाने लोखंडी जाळी लावून रस्ता अडवला आहे. या ठिकाणी साखळी रस्ता आहे. या ठिकाणी रस्ता विकसित करण्याची मागणी बेलापूरकर यांनी केली आहे.
पालिका शहर अभियंत्यानी 10 एप्रिलला जागेची समक्ष पाहणी केली. नगर रचना विभाग व स्थापत्य विभागाने कॅम्प लावून सदर जमीन डीपी रस्त्याखाली ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसे, पत्र संबंधित विभागाने 30 एप्रिलला आयुक्तांना दिले आहे. जमीन ताब्यात घेण्याबाबत नगर रचना विभागाचे उपसंचालकानी कार्यवाही सुरू केल्याचे उत्तर 5 मे रोजी दिले आहे. मात्र, पालिका प्रशासन तातडीने कारवाई न करता चालढकलपणा करीत असल्याची तक्रार बेलापूरकर यांनी केली आहे.