जळगाव। येथील वन विभागामार्फत विकसित होत असलेले लांडोरखोरी वनउद्यान आणि शहरात बांधण्यात येत असलेल्या बंदिस्त नाट्यगृह या दोन्ही पुर्णत्वाकडे येत असलेल्या कामांची जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज पाहणी केली. वन विभागामार्फत लांडोरखोरी वनउद्यानाचा विकास केला जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून याठिकाणी 70 हेक्टर क्षेत्रावरील वन उद्यान विकसित होत आहे. त्यात नक्षत्र उद्यान, विविध धर्मातील वाड.मयानुसार वृक्ष उद्यान, आयुर्वेद उद्यान, तलाव, वन भ्रमंतीसाठी मार्ग आदी विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी उपलब्ध करावयाच्या अन्य सुविधा, पाणी, सुरक्षा व्यवस्था आदींचे नियोजन यासंदर्भात जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करुन आढावा घेतला. आज सकाळी त्यांनी ही पाहणी केली.
वनपर्यटन क्षेत्र करण्याचा साकारात्मक चिन्हे
पाहणी करतांना समवेत जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी, मनपा आयुक्त जीवन सोनवणे तसेच वनसंरक्षक व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या वन उद्यानाचा वनपर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासंदर्भात महत्त्वाचे बदलही जिल्हाधिकार्यांनी संबंधितांना सुचविले. बंदिस्त नाट्यगृहाची पाहणी त्यानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी महाबळ परिसरात साकारत असलेल्या बंदिस्त नाट्यगृह कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत मनपा आयुक्त जीवन सोनवणे, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, उपअभियंता आदी उपस्थित होते. नाट्यगृहाच्या कामाची तात्काळ पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले उचलावित. अपूर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या.