लांडोर बंगला परिसरात 31 रोजी मोठी वाहनांना बंदी

0

पोलिस अधीक्षक एम. रामकुमार

धुळे । मोहाडी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले लळिंग येथील लांडोर बंगला परिसरात 31 रोजी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी मोठी वाहने घेवून जावू नयेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. पोलिस अधीक्षक रामकुमार यांनी म्हटले आहे, मोहाडी उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील किल्ले लळिंग येथील लांडोर बंगला परिसर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 31 रोजी धुळे जिल्ह्यातील विविध संघटनांतर्फे भीमस्मृती यात्रा मेळावा निमित्ताने जाहीर सभा, रक्तदान शिबिर, भंडारा, महाप्रसादासह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कार्यक्रमासाठी प्रामुख्याने धुळे शहर व धुळे जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. या ठिकाणी नागरिक मोठी वाहने घेवून जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.या पार्श्‍वभूमीवर विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधवांनी या कार्यक्रम स्थळी होणारी वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून लांडोर बंगला परिसरात आयोजित कार्यक्रम स्थळी मोठी वाहने उदा. ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉला, टेम्पो, 407, 609 आदी घेवून जावू नयेत व प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असेही पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी केले आहे.