दोन ठार चालकासह तिघे जखमी
पुणेः कात्रजवरून नर्हे रोडकडे जाताना सिलाई वर्ल्डजवळ दारुच्या नशेत गाडी चालवताना चालकाचे नियंत्रण सुटून गाडी लाईटच्या खांबावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निखिल चौखुले (वय 27, रा. पन्हाळा कोल्हापूर), आशुतोष यादव मयत (वय 29 वर्षे, सांगली), अशी मयतांची नावे असून चालक सुशांत पाटील (वय 25, रा. बेलवडे, कराड सातारा), धीरज शिंदे (भिलवडी वय 30), दिग्विजय महाजन (वय 24, ) हे तिघेही जखमी झाले आहेत.
अतिमद्यप्राशनामुळे चालकाचा ताबा सुटला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल होळीनिमित्त पाचही जणांनी पार्टी करून अतिप्रमाणात मद्यप्राशन केले होते. तसेच त्यांना आणखी दारू घ्यायची असल्याने ते कात्रज-देहूरोड बायपासवरून नर्हे येथे त्यांच्या फियाट पिंटो (एम.एच.12 के.एम8273) या गाडीतून जात होते. यावेळी सर्व्हिस रोडवर अभिनव महाविद्यालयाजवळ सिलाई वर्ल्ड समोर चालक पाटील याचे नियंत्रण सुटून गाडी लाईटच्या खांबावर आदळून पुढे सरळ खालच्या दिशेने 20 फूट उंच पुलावरून कोसळली.
यामध्ये चौखुले आणि यादव यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाटील, शिंदे गंभीर जखमी झाले असून महाजन हा किरकोळ जखमी झाला आहे. यापैकी एकास भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले असून दोघांसह मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. कात्रज पोलीस पुढील तपास करीत आहेत.