पुणे । उरुळी कांचन येथे शुक्रवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास आग लागून एक कापडाचे आणि त्याच्या शेजारील दोन फर्निचरची दुकाने जळून खाक झाली. शेजारीच लाकडी वखार असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर ही घटना घडली. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
सोलापूर रस्त्यावरील उरुळी कांचन येथे लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागून भीषण अग्नितांडव पाहावयास मिळाले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दल हडपसरची एक फायरगाडी व मुख्यालयातून दोन वॉटर ब्राऊझर टँकरसहीत घटनास्थळाकडे रवाना झालं. घटनास्थळी दोन सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, घटनास्थळाहून 3 सिलिंडर जवानांनी बाहेर काढले. दरम्यान, साडी, लाकडी फर्निचर व भंगार तसेच जुन्या लाकडी वस्तूंच्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत येथील सर्व दुकानं जळून खाक झाली आहेत.
2 ते 15 गुंठ्यांमध्ये साडीचे गोडाऊन व जुन्या सागवानी लाकडाचे मोठे गोडाऊन जळाले आहे. दरम्यान, साडीच्या दुकानात सर्वात आधी आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यामध्ये श्रीकृष्ण होलसेल साडी डेपो, तुळजाभवानी टिंबर्स,श्रीदत्त फर्निचर, श्री समर्थ फर्निचर, मोनाली एन्टरप्रायजेस अशी पाच ते सहा दुकानांची आगीत राख झाली आहे. या दुर्घटनेत सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आग लागण्यामागील कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.