लाखाची रोकड लांबवली,मुकबधीर आरोपी जाळ्यात

0

भुसावळ । रावेर शहरातील कटलरी व्यापारी मुंबई जाण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर थांबला असतानाच गाडीला विलंब असल्याने झोपल्याची संधी साधून चोरट्याने एक लाख सहा हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. 20 रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.

व्यापारी झोपताच साधला डाव
रावेरचे कटलरी व्यापारी उमेश भीमसिंग जाधव (35, पिंप्री, ता.रावेर) यांना मुंबई येथे कटलरी साहित्य घ्यावयास जावयाचे असल्याने ते रेल्वे स्थानकावर आले मात्र गाडीला विलंब असल्याने ते प्लॅटफार्म क्रमांक तीनवर झोपले. आरोपीने ही संधी साधत रोकडसह मोबाईल लंपास केला.

मुकबधीर आरोपी अखेर जाळ्यात
लोहमार्गच्या डीबी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर मुकबधीर आरोपी समीर उर्फ चैनवाला मजहर (24, रेल्वे स्टेशन, भुसावळ) यास ताब्यात घेण्यात आले असता त्याने चोरीची कबुली देत 61 हजार 900 रुपये व एक मोबाईल काढून दिला. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. लोहमार्गचे पोलीस उपनिरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जाधव, विजय कोळी, शैलेश पाटील, अजीत तडवी, जगदीश ठाकूर आदींनी ही कारवाई केली.

दुभाषकाची मदत घेऊन पुन्हा अटक करणार
आरोपी अट्टल असून त्याने आणखी काही चोर्‍या केल्याचा संशय असून या गुन्ह्यात आणखी चौकशी करावयाची असल्याने त्यास शुक्रवारी पुन्हा ताब्यात घेवू व दुभाषकाच्या मदतीने माहिती काढू, असे उपनिरीक्षक सुनील इंगळे यांनी सांगितले.