जळगावात कारवाई ; लाच न दिल्यास नोकरीची वाट लावण्याची दिली होती धमकी
जळगाव- बदली केल्यानंतर एक लाख रुपयांची लाच देण्याच्या मागणीसाठी नोकरीची वाट लावण्याची धमकी मंत्रालयातील क्लर्कला चांगलीच महागात पडली. जळगाव एसीबीच्या पथकाने त्यास गुरुवारी सायंकाळी जळगावात रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. ओमप्रकाश लखनलाल यादव (32) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो मंत्रालयातील महसूल विभागात लिपिक पदावर कार्यरत आहे. अत्यंत गोपनीयरीत्या एसीबीने हा सापळा यशस्वी केल्याने एसीबीच्या कार्याचे कौतुक होत आहे.
लाचेसाठी धमकी ; जळगावात सापळा रचून पकडले
तक्रारदार एका विभागात क्लर्क असून त्यांची अमरावती येथून जळगावात बदली करण्यात आली व ही बदली करण्यासाठी आरोपी तथा मंत्रालयातील महसूल विभागातील लिपिक ओमप्रकाश लखनलाल यादव (32, रूम नंबर 103, बी.व्हींग, गोपाल हाईटस्, बदलापूर, जि.ठाणे) याने मदत केल्याने त्यापोटी तक्रारदाराकडून तो सातत्याने एक लाखांची मागणी करीत होता शिवाय लाच न दिल्यास ‘तुझ्या नोकरीचीही मी वाट लावेल’, अशी धमकी देत होता. संशयीत आरोपीने 24 रोजी आपण जळगावात आल्याचे सांगून पुन्हा धमकी दिल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी, हवालदार मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींनी सापळा रचला. भुसावळ-जळगाव मार्गावरील हॉटेल बासुरीजवळ आरोपीला पैसे घेण्यासाठी बोलावण्यात आल्यानंतर पैसे घेताना तो अलगद एसीबीच्या जाळ्यात अडकला. दरम्यान, आरोपीच्या घर झडतीसाठी ठाणे एसीबीला कळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 1