जळगाव। आव्हाने रस्त्यावरील लक्ष्मी जिनींगमधे असलेल्या कापसाला बुधवारी दुपारी 1 वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत 12 क्विंटल कापूस जळाला असून अंदाजे 40 ते 45 लाखांचे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत होते. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले. दोन अग्निशामक दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नेमकी आग कशी लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. प्रखर उन्हाळा सुरु झाला की जिनिंगला आग लागण्याच्या घटना नेहमीच घडतच असतात. शहरापासून जवळच असलेल्या आव्हाणे शिवारात लक्ष्मण गंगाराम पाटील यांच्या मालकीची लक्ष्मी जिनिंग आहे. ही जिनिंग त्यांचे बंधू राजेश ट्रेडींग कंपनीचे मालक साहेबराव गंगाराम पाटील यांनी भाड्याने दिलेली आहे.
आग लागताच चालकाने केली आरडा-ओरड
राजेश ट्रेंडींग कंपनीचे मालक साहेबराव पाटील यांचा कापसाचा गाठी जिनिंगमध्ये नेहमीच येत असतात. त्यामुळे या ट्रेडींग कंपनीचा 3 हजार क्विंटल कापूस जिनिंगच्या आवारात होता. ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा कच्चा कापूस जिनिंगमध्ये प्रक्रिया करण्यासाठी वाहतूक केली जात असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास एका गंजीतून धूर निघत असल्याचे ट्रॅक्टर चालक उज्जवल सोनवणे यांच्या लक्षात आले होते. त्याने आरडा-ओरडा करत आग लागल्याचे कर्मचार्यांना सांगितले. जनिंगमधल्या एका इमारतीमध्ये अॅकाऊंटंट इंदर तिवारी काम करीत असतांना उज्वल आरडा-ओरड केल्याचे त्यांना ऐकू येताच त्यांनी इमारती बाहेर येवून पाहिले असता त्यांना कापसाला आग लागल्याचे दिसले. परिसरात काम करत असलेल्या कामगारांनी लागलीच आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. इंदर तिवारी यांनी तात्काळ मनपा अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. पंधरा ते विस मिनिटानंतर अग्निशमन बंब घटनास्थळी आल्यानंतर जळत्या कापसावर अग्निशमन कर्मचार्यांनी त्याच्यावर जोरदार पाण्याचा मारा केला. मात्र, आग सर्वत्र पसरल्याने दुसरे पाण्याचे बंबही घटनास्थळी बोलविण्यात आले. या आगीत 1200 क्विंटल कापूस जळून खाक झाला.
अंदाजे
45 ते 50 लाखांचे नुकसान
कापसाला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करत होते. यात धुराचे लोळ परिसरात दुरवर पसरलेले दिसून आले. अग्निशमन कर्मचार्यासह जिनिंगमधील कर्मचार्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर दिड ते दोन तासानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आहे. मात्र, आगीत कापूस जळून खाक झाला होता. अंदाजे 40 ते 45 लाखांचा कापूस हा जळून खाक झाल्याचे जिनिंगच्या कर्मचार्यांकडून सांगण्यात येत होते. यानंतर जिनींग मालक लक्ष्मण पाटील यांना आग लागल्याचे कळविण्यात आले होते. यातच आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट
झालेले नाही.