रावेर, जळगाव येथील कृषी अधिकाऱ्याने केला होता लाखोंचा गैरव्यवहार
मुंबई:- नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ९६ लक्ष रुपयांचा अपहार केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी नामदेव वाडे यांना अटक करून निलंबित केले आहे तर या प्रकरणी विजय भारंबे, सुधाकर पवार, तानाजी खर्डे यांना देखील जबाबदार धरले असून त्यांच्याविरुद्ध कृषी आयुक्तालय स्तरावर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय रावेर शासकीय कोषागारातून निधी काढून स्टेट बँक ऑफ इंडिया रावेर येथे त्यांच्या नावाने असलेल्या बचत खात्यात ठेवण्यात येत होता. स्टेट बँक ऑफ इंडिया, रावेर या खात्यातील रक्मेकारिता रोखवाही इत्यादी उपलब्ध नसल्याचे विद्यमान कृषी अधिकारी, रावे यांच्या ऑगस्ट २०१४ च्या दरम्यान निदर्शनास आले. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर ते जून २०१६ या कालावधीत ७०,७०,५१७ इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचे जुलै २०१६ मध्ये कृषी अधिकारी व विभागीय कृषी सह संचालक नाशिक यांच्या निदर्शनास आले होते, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे. जानेवारी २०१८ मध्ये विभागीय कृषी सह संचालक नाशिक यांच्याकडून मार्च २०१४ ते जून २०१६ या कालावधीत ९६ लाख ७५ हजार २८९ इतकी शासकीय रक्कम अफारीत झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी कृषी अधिकारी नामदेव वाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांना कृषी सह संचालकांनी निलंबित देखील केले आहे. त्यांच्या सोबत ओव्हर, भारंबे, खर्डे यांनाही यासाठी जबाबदार ठरविले आहे. त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही होणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी या विभागाच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शासनाची पूर्व परवानगी न घेता उघडलेली सर्व बँक खाली बंद करण्याचे आदेश जुलै २०१७ मध्ये दिले आहे. सद्यस्थितीत pfms प्रणालीद्वारे निधीचे वितरण केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी दक्षता पथकामार्फत करण्याबाबत कृषी आयुक्तांना कळविण्यात आले असल्याचे कृषीमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.