नवी दिल्ली । देशात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी निरनिराळ्या उपाय योजना करण्यात येत आहे. पण अशा स्वरुपाच्या व्यवहारांवर आता कंपन्यांनी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यावर ग्राहकांनी नाराजी वर्तवली होती. ग्राहकांचा रोख लक्शात घेऊन पेटीएमनेही क्रेडीट कार्डच्या माध्यमातून पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करण्यावर लावलेले 2 टक्के शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पेटीएमशी जोडलेल्या लाखो ग्राहक आणि व्यापार्यांचे हित लक्षात घेऊन, कंपनीने दोन टक्के शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेतला आहे. पेटीएमचा गैरवापर करणार्यांचा शोध घेण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातील, असे पेटीएमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एकिकडे पेटीएमने ग्राहकाला नाराज करणार्या शुल्काची आकारणी न करण्याचा निर्णय घेतला असताना त्यांची स्पर्धक कंपनी असलेल्या मोबिक्विकने मात्र क्रेडिट कार्डावरून वॉलेटमध्ये येणार्या रकमेवर शुल्क आकारण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
नुकसान टाळण्यासाठी आकारले होते शुक्ल
पेटीएमचा वापर करणारे ग्राहक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करतात. ही रोख रक्कम वापरता यावी यासाठी काही ग्राहक पेटीएम वॉलेटमधील रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करतात. या प्रकारामध्ये पेटीएमला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात आल्याने कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे पैसे हस्तांतरित करणार्यांवर दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला होता. क्रेडिट कार्डशिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करणार्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही कंपनीने जाहीर केले होते. मात्र, आता क्रेडिट कार्डद्वारे हस्तांतरित केलेल्या रकमेवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे कंपनीने जाहिर करुन आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे.