लाखो मराठे आज मुंबईत धडकणार!

0

मुंबई : मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबई सज्ज झाली आहे. प्रशासन आणि आयोजकांनीही विशेष खबरदारी घेतली आहे. मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, सायन ते कुलाबादरम्यानच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शांतता आणि सरक्षेसाठी मुंबई पोलिसांनीदेखील योग्य त्या उपायायोजना केल्या असून, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने पोलिस लक्ष ठेवणार आहेत. सुमारे सात हजार पोलिस मुंबई व उपनगरात तैनात करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडीची शक्यता
बुधवारी, 9 ऑगस्टरोजी सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत एकत्र येत असल्याने वाहतूक नियोजनाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता असल्याने दक्षिण मुंबईतील सायन, माहिम, दादर, वरळी आणि भायखळा ते कुलाबा या परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तसे आदेश दिले आहेत.

मोर्चेकर्‍यांसाठी आरोग्य सुविधा
मुंबई महापालिकेने मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे. 7 ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स, 8 ठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, 6 ठिकाणी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे.

ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था
मराठा मोर्चासाठी ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मराठा बांधव मोठ्या संख्येने एकवटणार असल्याने मुंबई आणि लगतच्या उपनगरामधील रेल्वे स्थानकांवर रेल मराठा स्वयंसेवक मदत करणार आहेत. मोर्चात सामील होणार्‍या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मोर्चाच्या नियोजनाबाबत सांगितले की, मराठा मोर्चात राजकीय भाषणे होणार नाहीत. मराठा समाजाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून, त्यांना निवेदन दिले जाईल. मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय व्हावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असून, आरक्षण हीच मुख्य मागणी आहे. राणीचा बाग-जे जे मार्गाने-आझाद मैदान असा मार्ग असून त्यानंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देईल.