लाखो विद्यार्थी खेळणार फुटबॉल

0

मुंबई । भारतात पुढील महिन्यात होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये येत्या 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार असल्याची माहिती बुधवारी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्त देशात एक कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावा अशी कल्पना मांडली आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबविला जाणार आहे. महाराष्ट्र मिशन वन मिलियन योजनेअंतर्गत राज्यभरातील सुमारे 30 हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे एक लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. प्रत्येक शाळेने फुटबॉल खेळणार्‍या किमान 50 विद्यार्थ्यांची नावे, पत्ते व आदी माहिती क्रीडा विभागाला कळविणे सुरू केले आहे. सुमारे 15 लाख विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ई-गॅझेटकडे शालेय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला असून मुलांचे मैदानावर खेळण्याचे प्रमाण कमी होत आहे. आजची मुले विविध खेळाचे सामने मैदानावर कमी तर मोबाईल किंवा संगणकावर अधिक प्रमाणात खेळताना दिसतात.