यावल । लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही सध्या समस्यांचे माहेरघर ठरत आहे. समितीच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून शेतकर्यांनी आणलेली लाखो रुपयांची केळी स्वच्छतागृहाबाहेर ठेवली जात असल्याचे विदारक चित्र सध्या याठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे येथील व्यापार्यांबरोबरच येथे येणार्या शेतकरी तसेच ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अस्वच्छतागृहाचे पाणी पोहोचले केळीमध्ये
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेल्या केळी अवतीभवती व केळीच्या खाली तेथील मुतारीचे पाणी आल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी व व्यापार्यांमध्ये नाराजी दिसून आली. बाजार समिती याकडे दुर्लक्ष करीत आहे. काँक्रीटीकरण नसल्याने पावसामुळे सर्वत्र घाणीचे व चिखलाचे साम्राज्यही पसरले आहे. शेतकरीवर्गातून व व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाजार समितीला दररोज लाखोे रुपयांचे उत्पन्न मिळत असूनसुद्धा येथील विदारक स्थिती पाहता बाजार समिती ही शेतकर्यांच्या जीवनाशी खेळण्याचे काम करीत आहे, असेच म्हणावे लागेल. शेतकर्यांच्या हिताच्या गोष्टी करणार्यांनी त्यांच्या समस्यांचे निवारण करुन सिमेंट काँक्रिटीकरण तात्काळ करणे गरजेचे आहे.