लाचखोर अभियंते एसीबीच्या जाळ्यात

0

नवी मुंबई । वीजवितरण कंपनीचे कोपरखैरणे येथील 2 अभियंते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. उपकार्यकारी अभियंता मधुकर कांबळे आणि कनिष्ठ अभियंता महेश पाटील अशी त्या दोन लाचखोर अभियंत्यांची नावे आहेत. या दोघांनी महापे एमआयडीसीतील कंपनीच्या ऑफीसला नवीन मिटरसाठी लागणारा फिजीबिलीटी रिपोर्ट आणि विजेचा मिटर देण्यासाठी तब्बल 80 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या 2 अभियंत्यांवर नवी मुंबईच्या लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांची महापे एमआयडीसीमध्ये ऍरामक्स इंडिया प्रा.लि. ही कंपनी असून त्यांनी या कंपनीने नवीन ऑफीस सुरू केले आहे. या कंपनीच्या कार्यालयासाठी वीजवितरण कंपनीकडून मिटरची आवश्यकता असल्याने त्यांनी वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज केला होता.

कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वीजवितरण कंपनीच्या कोपरखैरणे येथील उपकार्यकारी अभियंता कांबळे याने नवीन मिटरसाठी लागणारा फिजीबिलीटी रिपोर्ट तसेच मिटर रिलीज करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तर महापे येथील कनिष्ठ अभियंता पाटील याने पारदार यांच्याकडे साहेबराव शिवाजी देवरे यांच्या नावाने चेकद्वारे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाागाच्या एका पथकाने खातरजमा केली असता, या दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकरणी या 2 अभियंत्यांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी या लाचखोर अभियंत्याना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जळक करत आहेत.