लाचखोर अव्वल कारकुनासह पंटरावर कारवाईची संक्रांत

0

आधार सिडींसाठी 26 हजारांची लाच ; भुसावळ तहसीलमधील सापळ्याने लाचखोरांमध्ये खळबळ

भुसावळ- आधार सिडींग करण्यासाठी 26 हजारांची लाच घेणार्‍या भुसावळ तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन प्रुफुल्ल डिगंबर कांबळेसह खाजगीपंटर रहिम गवळी यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी साडेसह वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात पकडण्यात आल्याने तहसीलमधील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळ तहसील कार्यालयात विविध कामांसाठी नागरीकांची अडवणूक करण्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत्या तसेच प्रत्येक कामांसाठी कर्मचार्‍यांकडून लाच मागितली जात असल्याने नागरीक त्रस्त झाले होते. या कारवाईमुळे मात्र लाचखोरांमध्ये चांगलीच चपराक बसली आहे. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, निरीक्षक निलेश लोधी व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. शहर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.