लाचखोर कार्यकारी अभियंत्यास पोलिस कोठडी

0

जळगाव। तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेश हनुमंत सावंत यांना बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास 4 लाख 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. त्यांना गुरूवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणासाठी शेतजमिनी संपादित केलेल्या एकूण 110 शेतकर्‍यांशी संबंधित हा विषय आहे. या शेतकर्‍यांनी जमिनीचा मोबदला कमी मिळाल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल केली होती. तापी पाटबंधारे महामंडळाने शेतकर्‍यांना व्याजासह 3 कोटी 13 लाख रुपयांचे बिल अदा करावे, असा आदेश न्यायालयाने दिला. 3 कोटी 13 लाख रुपयांच्या दोन टक्केप्रमाणे 4 लाख 25 हजार रुपयांची लाच सावंत यांनी मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक पराग सोनवणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावरून बुधवारी रात्री सावंत यांना त्यांच्या घरात लाच घेताना रंगेहाथ अटक केली. त्यांना गुरूवारी न्यायाधीश नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 22 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. भारती खडसे यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. प्रकाश बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. एसीबीच्या पथकाने कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांचे जळगाव, पुणे येथे हाऊस सर्च केले असता. जळगाव येथील घरातुन 5 लाख 81 हजार 800 रूपये रोख मिळाले आहे. तर पुण्यातील कांडवा रोड व गोखले रोड येथील फ्लॉट येथे तपासणी सुरू आहे. तर डेक्कन येथील युको बँक मधील लॉकरची तपासणी सुरू असल्याचे एसीबीचे डिवायएसपी सोनवणे यांनी प्रतिनिधीला सागितले.