लाचखोर ग्रामविकास अधिकार्‍याला एका दिवसांची पोलिस कोठडी

जळगाव : चोपडा तालुक्यातील वर्डी येथील वर्डी येथील ग्रामविकास अधिकारी भगवान पांडूरंग यहिदे (रा. बोरवले नगर, चोपडा) यांना तडजोडी अंती 11 हजारांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी चोपडा शहरातील एका हॉटेलजवळ अटक केली होती. संशयीताला अटक केल्यांनतर जळगाव एसीबीच्या ताब्यात देण्यात आले. दुसर्‍या दिवशी मंगळवारी संशयीताला अमळनेर न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
खर्डी येथील तक्रारदार खाजगी बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय करतात. वर्डी ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत बांधकामाचे काम जळगाव येथील एका शासकीय ठेकेदाराने 31 डिसेंबर 2021 रोजी घेतले आहे. हे काम तक्रारदारांनी त्या ठेकेदारकडून 100 रुपयांचे स्टॅम पेपर करुन 11 फेब्रुवारी 2022 रोजी करारनामा केला होता. कराराप्रमाणे तक्रारदारांनी घेतलेले काम पूर्ण केले आहे. या कामाचे बिल शासकीय ठेकेदाराच्या नावे मिळण्यासाठी तक्रारदाराने ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदारांकडे 5 टक्के याप्रमाणे 12 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली. या संदर्भात खर्डी येथील तक्रारदारांनी धुळे येथील एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे हे एका महिन्यात अर्थात 30 जूनला निवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच जाळ्यात अडकल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. हा सापळा पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.