साक्री । नवीन शर्तीची जमीन हस्तांतरण करण्यासाठी तक्रारदाराकडून 15 हजारांची लाच घेतांना साक्री येथील नायब तहसिलदाराला नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज रंगेहात पकडले.या कारवाईने तहसिलदार कार्यालयात एकच खळबळ उडाली. साक्रीमधील एका तक्रारदाराराने नवीन शर्तीची जमीन घेतली होती. ती जमीन हस्तांतरण करण्यासाठीचे प्रकरण तयार करुन तहसिलदार कार्यालयात सादर करण्यात आले होते. ही जमीन नावावर करण्यासाठी नायब तहसिलदार के.डी. मोरे यांनी तक्रादाराकडे 15 हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रादाराने थेट नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. साक्री तहसिलदार कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रादार यांच्याकडून 15 हजारांची लाच घेतांना नायब तहसिलदार मोरे यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल प्रशासन हादरले आहे. या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.