जळगाव। मृताच्या कुटूंबियांना अॅक्सिडेंट क्लेम मंजुर करण्यासाठी सात हजारांची लाच घेतल्याप्रकरणी दोन्ही पोलिसांना गुरूवारी न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्या. अग्रवाल यांनी दोघांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराच्या जवळच्या नातेवाइकाचा अपघातात मृत्यू झाला होता. मृताच्या कुटुंबीयांना अॅक्सिडेंट क्लेम मंजूर करावयाचा होता. यासाठी लागणारी कागदपत्रे देण्यासाठी पोलिस काँन्स्टेबल अनंत चौधरी याने तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर चौधरी यास लाच घेताना पकडले. सोबत असलेला फौजदार जगदीश चौधरी तेथून पसार झाला होता. त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज गुरूवारी न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात अनंत चौधरी व जगदीश चौधरी या दोघांना हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कार चोरट्यास चार दिवसांची पोलिस कोठडी
जळगाव। वाशी येथून भाड्याने आणलेली कार पळवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. चौधरी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांनी दुसर्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्याला गुरूवारी न्यायाधीश चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भाईंदर (मुंबई) येथील विक्रम धीरेंद्र दास (वय 40) यांच्या मालकीची कार (क्र. एमएच-02-सीआर-1887) कल्याण भिवंडी बायपास रस्त्यावरून भुसावळ येथे लग्नाला जाण्यासाठी सय्यद शकील सय्यद युसूफ (वय-37, रा. जवाहर नगर, इक्बाल चौक, जि. बुलडाणा) याने भाड्याने घेतली होती. 4 मार्च रोजी रात्री जळके गावाजवळ मोबाइल खाली पडल्याचा बहाणाकरून दोघांनी चालकाला खाली उतरवून कार लंपास केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सय्यद शकील याला अटक करून न्यायाधीश चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.