लाचखोर पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात
पीएम रीपोर्ट व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी दहा हजारांची लाच भोवली
अहमदनगर : मोटार अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचा पीएम रीपोर्ट व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणार्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे यांना बुधवारी दुपारी पोलिस ठाण्यातच लाच स्वीकारताच नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिस ठाण्यातच केली अटक
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या 40 वर्षीय ऊस तोड कामगाराच्या नातेवाईकांचे मोटार अपघातात निधन झाल्यानंतर त्याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मयत व्यक्तीचा पोस्टमार्टेम रीपोर्ट व पंचनाम्याची प्रत मिळण्यासाठी आरोपी पोलिस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे यांनी 16 मार्च रोजी 15 हजार रुपये लाच मागितली मात्र दहा हजारात तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार केली व लाचेची पडताळणी करण्यात आली. बुधवारी दुपारी आरोपी कुंढारे यांनी पोलिस ठाण्यात लाच स्वीकारताच त्यांना नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही.पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, हवावलदार दीपक कुशारे, हवालदार सचिन गोसावी, नाई एकनाथ बाविस्कर, चालक जाधव आदींच्या पथकाने यशस्वी केला.