जिल्हा न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळला
जळगाव : संपत्तीची चौकशी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला जिल्हा विशेष शाखेचा कर्मचारी विजय उर्फ बाळासाहेब छगनराव जाधव याची पोलीस कोठडची मुदत संपल्याने मंगळवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. ज्योती दरेकर यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तत्पूर्वी संशयित जाधव याने जामीनअर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो नामंजूर केला आहे.
मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथील तत्कालिन मंडळाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणात अटक केली होती. या काळात संपत्तीची चौकशी करु नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन निरीक्षक व सध्या नागपूर येथे सहायक निरीक्षक असलेले भिमा संभाजीराव नरके, जिल्हा विशेष शाखेचे विजय जाधव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्यामकांत जगन्नाथ पाटील व अरुण विठ्ठल पाटील यांनी संशयिताकडे पाच लाखाची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. खंडपीठाच्या आदेशाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी विजय जाधव याला रविवारी अटक केली होती.
संशयित उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
जाधव यास पोलीस कोठडची मुदत संपल्याने मंगळवारी न्या.ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान संशयिताने दाखल केलेल्या जामीनअर्जावरही कामकाज झाले. न्या.दरेकर यांनी तो नामंजूर केला. सरकारपक्षातर्फे अॅड. भारती खडसे, आरोपीतर्फे अॅड.पंकज अत्रे, अॅड.अविनाश पाटील यांनी काम पाहिले. न्यायालयातून रुग्णालयात आल्यावर संशयिज जाधव यांच्या छातील दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. उपचारार्थ त्यांना दाखल करण्यात आले आहे.