लाचखोर मंडळ अधिकार्‍यास पोलीस कोठडी

0

जळगाव । शेतीखरेदीच्या 7/12 रेकॉर्डला नोंद घेण्यासाठी चार हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी सोमा भिला बोरसे (वय 51) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली होती. त्यांना शनिवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन दिवसांची कोठडी
चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथे तक्रारदाराने शेतजमीन घेतली होती. या शेतजमिनीची 7/12 रेकॉर्डला नोंद घेण्यासाठी त्यांनी मेहुणबारे येथील तलाठ्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली होती. तसेच तलाठ्यांनी 7/12 रेकॉर्डला नोंदही घेतली होती. त्यानंतर ही नोंद मंजूर होण्यासाठी प्रकरण मेहुणबारे येथील मंडळाधिकारी सोमा बोरसे यांच्याकडे पाठवले होते. त्यांनी चार हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी एसीबीच्या पथकाने शुक्रवारी बोरसे यांना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायाधीश नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. भारती खडसे यांनी कामकाज पाहिले.