लाचखोर महिला वैद्यकीय अधिकार्‍यासह परीचर एसीबीच्या जाळ्यात

0

कापडणे आरोग्य केंद्रात सापळा ; धुळे एसीबीच्या कारवाईने खळबळ

धुळे- कापडणे आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवरील सेवानिवृत्त चालकाचा प्रवासभत्ता आणि वेतन फरकाचे बिल मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना कापडणे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री ठाणसिंग ठाकूर तसेच परीचर दिलीप निकुंभे यांना धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती. आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर शुक्रवारी आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.

आरोग्य केंद्रातून आवळल्या मुसक्या
सेवानिवृत्त चालक व तक्रारदाराकडे डॉ.ठाकूर यांनी सात हजार रुपयांची मागणी केली मात्र पाच हजारांवर तडजोड झाल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात सापळा लावण्यात आला. डॉ.ठाकूर यांनी लाचेची रक्कम परीचर दिलीप देवराम निकुंभे यांना देण्याचे सांगताच दोघांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, वलवाडी शिवारात असलेल्या डॉ.ठाकूर यांच्या घराचीही झडती घेण्यात आली मात्र त्यात काहीही आढळले नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आरोपींना धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर शुक्रवारी आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तो न्यायालयाने मंजूर केला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडिले, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, शरद काटके, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.