500 रुपयांची लाच घेताना झाली होती कारवाई ; पसार पंटरचा शोध सुरू
शिरपूर- तालुक्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर मध्यप्रदेशात वाहन जावू देण्यासाठी 500 रुपयांची लाच मागणार्या मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील (39) व मोटार वाहन निरीक्षक गणेश सजन पिंगळे (दोन्ही अधिकारी वर्ग- 1) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री 9.30 वाजता अटक केली होती. आरोपींना शुक्रवारी धुळे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, कलेक्शन करणारा खाजगी पंटर पसार असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दोघा अधिकार्यांना एकाचवेळी पकडले
शिरपूर तालुक्यातील हाडाखेडा तपासणी नाक्यावर कागदपत्रे असतानाही केवळ तपासणीच्या नावाखाली पाचशे रुपये सक्तीने एन्ट्री घेतली जात असल्याची ट्रक चालकाची तक्रार होती. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तक्रारदाराचा ट्रक हाडाखेड तपासणी नाक्यावर आल्यानंतर मध्यप्रदेशात जावू देण्यासाठी खाजगी पंटराकडून 500 रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर पथकाने दोघा मोटार वाहन निरीक्षकांना अटक केली तर अज्ञात पंटर मात्र कारवाईचा सुगावा लागल्याने पसार होण्यात यशस्वी झाला होता. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले, पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व कर्मचार्यांनी केली होती. आरोपींना शुक्रवारी धुळे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.