धुळे । विद्युत कनेक्शन संदर्भात कारवाई टाळण्यासाठी शेतकर्याकडून 2 हजार 600 रूपयांची लाच घेतांना विद्युत कंपनीच्या पारोळा ग्रामीण कार्यालयातील विद्युत सहाय्यक गीतकुमार शिरसाठ याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज अटक केली.
मोंढाळे (ता. पारोळा) येथील पोलीस पाटील यांनी शेतात विजेच्या खांबावरून पुरवठा घेतला होता. ही माहिती पारोळा ग्रामीण कार्यालयातील शिरसाठ यांना मिळाली. त्यांनी शेतात जाऊन वायर काढून घेतल्या कारवाई टाळण्यासाठी विद्युत सहाय्यक शिरसाठ याने पोलीस पाटील यांच्याकडून 2 हजार 600 रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. सापळा रचून विद्युत सहाय्यक शिरसाठ याला लाच घेतांना रंगेहाथ पकडले. कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, उपअधीक्षक क्षत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भोरटेकर, पी.पी. देसले, हवालदार संदीप सरग आदींनी केली.