पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील उद्यमनगरात असलेल्या क्रीडा प्रबोधिनी शाळेत जेवण व नाश्ता पुरवणार्या ठेकेदाराकडून जेवण व नाश्ताचा दर्जा चांगला असल्याबाबतचा अहवाल देण्यासाठी तसेच पुरवलेले जेवण व नाश्ताचे बिल मंजूर करण्यासाठी अनुक्रमे 5 व 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने क्रीडा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड (वय 34) व पिंपरीच्या शिक्षणाधिकारी अलका ज्ञानेश्वर कांबळे (वय 54) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुणे युनिटच्या विशेष पथकाने केली. जेवण व नाश्ताचा अहवाल देण्यासाठी मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी 5 हजार तर पुरवलेले जेवण व नाश्ताचे बिल मंजूर करण्यासाठी शिक्षणाधिकारी अलका कांबळे यांनी 20 हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली होती.
14 मार्चला तक्रार
या प्रकारासंदर्भात तक्रारदाराने 14 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मुख्याध्यापक राठोड व शिक्षणाधिकारी कांबळे यांची तक्रार केली होती. त्यानुसार, या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजता लाचलुचपत विभागाच्या पथकाने क्रीडा प्रबोधिनी शाळेत सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना दोघांना पथकाने रंगेहाथ पकडले. दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटचे पोलिस निरीक्षक राजू चव्हाण, पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, सुनील शेळके, किरण चिमटे यांच्या पथकाने केली.