शहादा- महसूल विभागातील मंडळ अधिकारी पितांबर सुकलाल पेंढारकर यांची येथील तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी.गोंधळेकर यांनी लाच स्विकारल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. सुलतानपूर, ता.शहादा शिवारातील ग्रामपंचायत गावठाण शेतजमीन गट नं. 255 पैकी सुमारे साडेचार एकर शेतजमीन गावातील ईसम सुमारे दहा वर्षापासून खेडत होता. त्या शेतजमिनीत त्याने केळीचे पीक लावलेले होते. सदर शेतीतील पीक शासनजमा करण्याचे सांगत सदर जमीन खेडू देण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार नंदुरबार येथील लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. यावेळी पितांबर पेंढारकर म्हसावदचे मंडळ अधिकारी होते तर ब्राम्हनपुरी मंडळाचा पदभारही त्यांच्याकडे होता. या फिर्यादीवरून लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांच्या पथकाने 27 मे 2014 रोजी पेंढारकर यांच्यावर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची कारवाई करीत शहादा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात तत्कालीन जिल्हाधिकारी, तपास अधिकारी, तक्रारदार व साक्षीदार असे प्रमुख चार साक्षी तपासण्यात आल्यात. सरकार पक्षाला आरोपीवरील आरोप सिद्ध न करता आल्याने न्यायालयाने मंडळ अधिकारी पितांबर सुकलाल पेंढारकर यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीकडून अॅड. अमोलकुमार डी. गुलाले यांनी काम पाहिले.