भुसावळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईच्या खटल्यात तक्रारदाराने न्यायालयात खोटी साक्ष दिल्याने खटल्यातील दोघे निर्दोष सुटले. या प्रकरणात फितूर झालेल्या तसेच खोटी साक्ष देणार्या विशाल पंडीत सोनवणे (रा.बोदवड) या तक्रारदाराविरुद्ध खटला दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने संबंधितास दोन महिने सश्रम कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
न्यायालयात तक्रारदार झाला फितूर
विशाल सोनवणे याला आधार कार्ड काढायचे होते. त्यासाठी तो शहरातील जामनेर रोडवरील महा ई-सेवा केंद्रात गेला होता. त्यास तेथील ऑपरेटर नीलेश देशमुख व चंद्रकांत नामदेव महाजन यांनी आधार कार्ड काढण्याकामी 160 रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी सोनवणे याने जळगाव एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचून कारवाई केली. दोन्ही आरोपींवर भुसावळच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष केस क्रमांक 12/2015 नुसार खटला दाखल होता. या खटल्याच्या सुनावणीत विशाल सोनवणे याची साक्ष झाली. मात्र, त्याने खोटी साक्ष दिल्याने 13 जानेवारी 2020 रोजी न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर फितूर तक्रारदाराविरुद्ध योग्य कारवाईकरीता खटला चालवण्यासाठी एसीबीने भुसावळ येथील सरकारी अभियोक्ता विजय खडसे यांना विनंती केली होती. त्यानुसार 11 फेब्रुवारीला खटला दाखल झाला. न्या.एस.बी.भन्साली यांच्यासमोर कामकाज पूर्ण झाले. त्यात न्यायालयाने फितूर तक्रारदार विशाल सोनवणे यास दोषी ठरवून दोन महिने सश्रम कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी कळवले आहे.