लाच देणार्‍या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यास अटक

0

धुळे। जिल्हा दौर्‍यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्य आमदाराना आपले पितळ उघडे होऊ नये म्हणून शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना दिड लाखाची लाच देताना पकडून दिल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित अधिकार्‍यास ताब्यात घेतले आहे.

सायंकाळी अटक
पंचायत राज समिती तीन दिवसांपासून दौर्‍यावर आहे. दौर्‍यात 23 पैकी राज्यातील ठिकठिकाणचे 16 सदस्य आमदार सहभागी झाले होते. समितीप्रमुख आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा परिषदेत दुपारी कामकाज आटोपल्यानंतर संबंधित सदस्य आमदार शहरातील हॉटेल झंकार पॅलेसमधील मुक्कामाच्या ठिकाणी परतले. दरम्यान सायंकाळी साडेपाचला आमदारास लाच देताना जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यास लाच लुचपत खात्याने ताब्यात घेतले

आमदार पाटलांची तक्रार
नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना पकडून दिल्याची माहिती दिली. आठवड्यापूर्वी माळी येथील जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. त्यांनी शिरपूरला गटविकास अधिकारी, नंदुरबार येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळलेला आहे. आमदार पाटील यांनी तक्रार केल्यावर ही कारवाई झाली. त्यांना प्रेमाची भेट’ देण्याचा प्रकार अधिकारी माळी यांना चांगलाच महागात पडला आहे. आमदार पाटील हे मूळचे कापडणे (ता. धुळे) येथील रहिवाशी आहेत, हे विशेष!

चौकशी टळावी म्हणून…
समितीने धुळे तालुक्यात कापडणे, नेरसह अनेक गावांचा दौरा केला. त्यात पाणी योजना, आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या, पोषण आहार, पाणी योजनांसह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली. त्यातील काही योजनात गैरप्रकार, अनियमितता आढळली होती.