जळगाव : कंत्राटी पदावर सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवून देण्यासाठी दोन लाख 10 हजारांची मागणी करून त्यातील पहिला 30 हजारांचा हप्ता स्वीकारताना जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई गोपाळ कडू चौधरी (55, रा.जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) यास जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली होती. संशयीतास मंगळवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लाच प्रकरणात अधिकार्यांची होणार चौकशी
जळगाव तालुक्यातील 35 वर्षीय सुशिक्षीत बेरोजगाराने जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. सुरक्षा रक्षक पदावर नोकरी लावून ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपी शिपाई गोपाळ कडू चौधरी याने सोमवारी दोन लाख 10 हजारांची मागणी केली व त्यातील 30 हजारांची रक्कम सोमवारीच पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून स्वीकारताना एसीबीने मुसक्या आवळल्या होत्या. एका शिपायाकडून एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर लाचेची मागणी शक्यच नाही, या प्रकरणात अन्य अधिकार्यांचा सहभाग असल्याची दाट शक्यता आहे. पोलिस कोठडीत या सर्व बाबींचा उलगडा होणार असल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील करीत आहेत.