लाच प्रकरणी निरीक्षकासह तिघांना जामीन

0

मलकापूर । प्रतिनिधी । सात हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलिस हेडकॉन्स्टेबलला बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; मात्र न्यायालय आणि तपासी अधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना जिल्हा सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

गौण खनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून ७ हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे, सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव खांडेकर आणि मोहम्मद इस्तीयाज यांना रंगेहात अटक केली होती. मोहम्मद इस्तीयाज याने पैसे स्वीकारले, तर ठाणेदार अंबादस हिवाळे यांनी ते घेऊन खिशात टाकले होते. सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव खांडेकर याच्या भ्रमणध्वनीवरून या प्रकरणात तक्रारदार असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला होता. त्यामुळे त्यालाही यात अटक करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी दुपारी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तपासात सहकार्य करणे, पोलीस ठाण्यातील कर्मचारी तथा साक्षीदारांना न धमकावणे आणि न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय तथा तपासी अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय जिल्हा सोडून जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.