लाच प्रकरण : सहाय्यक निरीक्षकासह उपनिरीक्षकाची पोलीस कोठडीत रवानगी

Bribery Case : Sub Inspector sent to police custody along with assistant inspector भुसावळ : सावदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यात संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी न करण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी सावद्यातील सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (52, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (32, रा.सावदा, ता.रावेर) यांना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. संशोध आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
जळगाव तालुक्यातील 42 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आकाश कुमावतविरोधात सावदा पोलिसात अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी गुरनं.0136/2022 भादंवि 363, 376 (2), (एन) पोस्को व कायदा कलम 4 अन्वये 24 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आकाश यास 27 ऑगस्ट 2022 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार हे आपल्या मुलास भेटण्यासाठी सावदा पोलिसात गेल्यानंतर संशयीत आरोपी व पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी मुलीला तुमच्या घरी आणल्याने तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी 60 हजारांची पंचांसमक्ष लाच मागितली होती मात्र 15 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर वरीष्ठांच्या आदेशान्वये मंगळवारी सकाळी आठ वाजता दोघा संशयीतांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान बुधवारी दुपारी दोघा संशयीतांना भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.