लाच भोवली : मारवड पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव एसीबीच्या कारवाईने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ

भुसावळ/अमळनेर : विनयभंगाच्या गुन्ह्यात तपासात मदत करण्यासह चार्जशीट पाठवण्यासाठी 15 हजारांची लाच मागणी करून ती स्वीकारणार्‍या मारवड पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने शनिवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. पोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण (51, रा.जुनी पोलीस लाईन, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीने अमळनेर शहरातील पोलीस लाईनमधील राहत्या घरीच तक्रारदाराकडून लाच स्वीकारली.

राहत्या घरीच स्वीकारली लाच
अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील 45 वर्षीय तक्रारदार, त्यांचे वडील व भाऊ यांच्याविरोधात मारवड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करून या गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात संशयीत आरोपी पोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण यांनी शनिवार, 23 रोजी 15 हजारांची लाच मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम देण्यासाठी चव्हाण यांनी तक्रारदाराला अमळनेर शहरातील जुन्या पोलीस लाईनमधील घरी बोलावले. लाचेची रक्कम स्वीकारताच पंचांसमक्ष आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा एसीबीचे नाशिक अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अपर अधीक्षक् सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख,
कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.