युतीच्या आमदारांची बडदास्त पंचतारांकित हॉटेलात
मुंबई : विधानपरिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 7 डिसेंबररोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेकडून प्रसाद लाड मैदानात असून, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सोलापूरचे दिलीप माने मैदानात आहेत. मतदानासाठी सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांनी भाजप-शिवसेनेच्या आमदारांची बडदास्त मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात ठेवली आहे.
म्हणूनच भंडारींना डावलले…
प्रसाद लाड यांनी सुमारे 200 आमदारांसह शेकडो पदाधिकार्यांना फाईव्ह स्टार हॉटेलात ठेवून पैशाची मोठी उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे. लाड हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते म्हाडाचे अध्यक्ष होते. उद्योजक असलेल्या लाड यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. दोन वर्षांपूर्वी लाड भाजपमध्ये आले असून, श्रीमंत उमेदवार असल्याने भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून प्रसाद लाड यांना भाजपकडून तिकीट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अजूनही रंगली आहे.
लाडांकडे 200 कोटींची संपत्ती
विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपकडून अर्ज भरणारे प्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती आहे. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, लाड यांच्याकडे 47 कोटी 71 लाखांची जंगम मालमत्ता आहे. यापैकी 39 कोटी 26 लाख शेअर्स व बाँडच्या स्वरूपात गुंतवले आहेत. पत्नी नीता यांच्याकडे 48 कोटी 95 लाख, मुलगी सायलीकडे 1 कोटी 15 लाख व मुलगा शुभमकडे 28 लाख 28 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्याकडे 56 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप माने यांच्याकडे एकूण 20 कोटी 99 लाख रुपयांची संपत्ती आहे. माने यांच्याकडे 2 कोटी 20 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.