लातूरजवळ भीषण अपघातात 7 ठार, 13 जखमी

0

लातूर-नांदेड मार्गावरील पहाटेची दुर्घटना

लातूर : नांदेड मार्गावर मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांच्या भीषण अपघातात 7 जण ठार, तर 13 जण जखमी झाले आहेत. लातूर रोड रेल्वेस्थानकाहून प्रवाशांना घेऊन एक क्रूझर लातूरला निघाली होती. या गाडीत चालकासह दहाजण होते. दोन क्रूझर जीप व एक टेम्पो अशा तीन वाहनांच्या विचित्र अपघातात लातूर रोडहून येणार्‍या क्रूझरचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यातील सात प्रवासी जागीच ठार झाले तर, चार जखमी झाले. दुसर्‍या क्रूझरमधील नऊ जण जखमी झाले. जखमींना लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सात जण जागीच ठार
मंगळवारी लातूर रोड (ता. चाकूर) येथील रेल्वेस्थानकावर पावणे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून उतरलेल्या नऊ प्रवाशांना घेऊन एक क्रूझर जीप लातूरकडे निघाली होती. ती साडेचार वाजता कोळपागावाजवळ आली असता अंधारामुळे चालकाला पुलाच्या कडेला उभा असलेला आयशर टेम्पो दिसला नाही. त्यामुळे क्रूझरची टेम्पोला जोरदार धडक बसली. याच वेळी समोरून येणार्‍या दुसर्‍या क्रूझर जीपलाही धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, लातूरकडे जात असलेल्या क्रूझरचा पूर्ण चेंदामेंदा झाला. गाडीचे पूर्ण छत फाटले. त्यातील सात जण जागीच ठार झाले तर चारजण जखमी झाले. यासोबत दुसर्‍या क्रूझर मधील नऊजण जखमी झाले.

दहा दिवसांत तिसरा अपघात
लातूरमध्ये मागील काही दिवसापासून वाहनांच्या अपघाताचे सत्र सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी निलंगा-औसा रस्त्यावर ट्रक-बस अपघातात 7 जण ठार झाले होते. काल त्याच रस्त्यावर ट्रक व कारच्या धडकेत तीन ठार व दोन जखमी झाले होते.

मृतांची नावे
1) विजय तुकाराम पांदे (वय 30, रा. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक)
2) तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय 35, रा. दापेगाव, ता. औसा)
3) उमाकांत सोपान कासले (वय 40, रा. रेणापूर नाका, लातूर)
4) मीना उमाकांत कासले (वय 40, रा. रेणापूर नाका, लातूर)
5) शुभम शरद शिंदे (वय 24, रा. बेलपिंपळगाव, ता. जि. अहमदनगर),
6) मनोज चंद्रकांत शिंदे (वय 25, रा. वैशालीनगर, बाभळगाव)
7) दत्तू बळीराम शिंदे (वय 35, रा. हिंपळनरी, ता. मुखेड, जि. नांदेड).

जखमींची नावे
1) अर्जुन रामराव राठोड (वय 27, परतूर, जि. जालना)
2) शब्बीर बालेखाँ खान (वय 19, रा. निलंगा)
3) कृष्णा दौलत भवर (वय 19, रा. नाशिक)
4) मलिकार्जुन गोविंद होडे (वय 32, गातेगाव, ता. लातूर)
5) वैष्णवी धनंजय भालेराव (वय 18, दीपज्योतीनगर, लातूर)
6) मदन विठ्ठल पवार (वय 23, रा. औरंगाबाद)
7) शेख इम्रान इम्तेयाज (वय 19, रा. चाकूर)
8) गणेश उमाकांत कासले (वय 12, रा. रेणापूरनाका, लातूर)
9) विद्या धनंजय भालेराव (वय 42, दीपज्योतीनगर, लातूर)
10) ज्ञानेश उमाकांत कासले (वय 11, रा. रेणापूरनाका, लातूर)
11) रामराव मारोती घुगरे (वय 49, रा. नाशिक)
12) रविदास जयराम सानप (वय 34, रा. नवी मुंबई)
13) अजय दयानंद वाघमारे (वय 24, लातूररोड, लातूर)